धक्कादायक! कपडे वाळवताना विजेचा धक्का, आतेबहिणींचा जागेवरच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

केज – केज तालुक्यातील शिंदी येथे गुरुवारी (दि. १) दुपारी एकेच्या सुमारास  २२ वर्षीय विवाहित तरुणी कपडे वाळू घालत असताना तिला  विजेचा धक्का बसला व  तिला वाचवण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय आतेबहिणीचाही मृत्यू झाला. दिवाळी सणासाठी विवाहिता माहेरी तर मुलगी आजोळी आली होती.

शिंदी येथील अनिल पाटील यांची कन्या रेणुका थोरात ही दिवाळीच्या सणासाठी माहेरी आली होती. तर लोणगाव (ता. माजलगाव) येथील अश्विनी भागवत जोगदंड (वय १५) ही आजोळी आली होती. 
रेणुकाची अश्विनी ही आतेबहीण होती. गुरुवारी दुपारी १ वाजता रेणुका घरासमोर बायंडिंग तारेवर कपडे वाळू घालत असताना तारेला चिटकली. जवळच असलेली अश्विनी रेणुकाला वाचवण्यासाठी गेली. 

मात्र अश्विनीलाही विजेचा धक्का बसल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास रेणुकाचे वडील अनिल पाटील हे घरी आले असता सदरील प्रकार त्यांच्या लक्षात आला. 

घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष मिसळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, बाळासाहेब मुंडे, पोलीस नाईक आशा चौरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. केज पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24