लातूर : येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जा. आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. उलट आत्महत्येने तुमचे घर पोरके होईल. शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत उभी आहे.
असा दिलासा देतानाच तुमच्या आशीर्वादाने आमचे सरकार सत्तेवर आले तर कसल्याही अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजारांचे अनुदान देण्यात येईल,
अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. पीक पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करायचा नसतो, असा टोलाही त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. अहमदपूर तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी खंडाळी, उजना, सांगवी, सुनेगाव शिवारात जाऊन केली.
या वेळी शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संजय नार्वेकर, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर ठाकरे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी पूर्णत: हवालदिल झालेला आहे.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेली १० हजार कोटींची मदत ही अत्यंत कमी आहे. प्रत्यक्षात ती अतिशय तुटपुंजी रक्कम असून शासनाने प्रत्येक शेतकऱ्यास प्रतिहेक्टर कमीत कमी २५ हजार रुपये नुकसानभरपाई कोणत्याही अटी न लावता द्यावी. अशी मागणी केली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ‘मनरेगा’च्या माध्यमातून जास्तीत जास्त भरीव नुकसानभरपाईची मदत द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.