मुंबई : माटुंगा येथील मनपाच्या एस/साऊथ कार्यालयातील तळमजल्यावर असलेल्या नागरिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून कररूपात जमा झालेली रक्कम चोरट्याने चोरल्याचे उघड झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम या वेळी चोरट्यांनी पळवली.
या प्रकरणी माटुंगा पोलीस तपास करीत आहेत. माटुंगा (प.), महेश्वरी सर्कल, भाऊ दाजी रोड या ठिकाणी मनपाच्या एस/साऊथ वार्डचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या तळमजल्यावर मनपाचे नागरिक सुविधा केंद्र असून, खाजगीरीत्या चालवण्यात येणाऱ्या या सुविधा केंद्रातून विविध बिले स्वीकारली जातात.
त्यातून मिळणारी रक्कम मनपाच्या हवाली करण्यात येते. ती रक्कम मनपा त्याच्या कार्यालयातील तिजोरीत ठेवून चावी कार्यालयातच ठेवते. त्यानंतर कार्यालय बंद झाल्यानंतर मनपा सुरक्षा रक्षकाकडे कार्यालयाची चावी दिली जाते.
शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात आरोपीने खिडकीवाटे कार्यालयात घुसून कार्यालयातील तिजोरीच्या चावीचा शोध घेत तिजोरीतील दीड लाख रुपयांची चोरी करून चोरट्यांनी पळ काढला.
या प्रकरणी शनिवारी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.