मुंबई : राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश देऊनही केवळ कोणाचा तरी हट्ट, आग्रहामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याची खरमरीत टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
असे असले तरी भाजपा राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. सध्या तरी भाजपाची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका कायम असून भाजपा योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करेल, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता. आम्ही कधीच कोण त्याही पर्यायांचा शोध घेतला नाही. मात्र आमच्या मित्रपक्षाने इतर पर्यायांचा शोध घेणे सुरू केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यपालांनी आमंत्रण देऊनही कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. १८ दिवस त्यांना कोणत्याही पक्षाचे समर्थन प्राप्त होऊ शकले नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हा जनादेशाचा अवमान आहे. शेतकरी, शोषितांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थिर सरकार येणे आवश्यक होते.
पण कोणाच्या तरी हट्टापायी ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अद्यापही शिवसेनेला मिळू शकलेला नाही. या दोन पक्षांच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेटही घेतलेली नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.