मुंबई – राज्यात सत्ता स्थापनेवरुन अद्यापही राजकीय पेच कायम आहे. भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे मात्र, अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाहीये.
तसेच उद्धव ठाकरेंनी फोडाफोडीच राजकारण होऊ नये म्हणून सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली, या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्री पदावर आणि आपल्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं ठरवलं आहे.
त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने अद्यापही राज्यात सत्तेचा तिढा सुटलेला नाहीये.
यामुळे राज्यात राजकीय पेच वाढला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला कोकोण दौरा रद्द करुन मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आपला ठरलेला कोकण दौरा रद्द करुन शरद पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत एकत्र येऊन पाठिंबा देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यात काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार हे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवार आता मुंबईत दाखल झाल्यावर नेमकी काय भूमिका घेतात हे पहावं लागेल.