मुंबई : घोटकोपर, पंतनगर परिसरात राहणाऱ्या मुलीने भटक्या श्वानाला घराबाहेर काढल्याच्या रागातून आईवरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याची घटना घडली आहे.
तक्रारदार मुलीने काही महिन्यांपूर्वी भटक्या श्वानाला घरी आणले होते. पंतनगर पोलिसांनी आईिवरोधात प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली आहे. घराबाहेर काढल्यापासून हा श्वान बेपत्ता आहे.
जानेवारी महिन्यात यातील तक्रारदार स्नेहाच्या मैत्रिणीला रस्त्यात श्वानाचे पिल्लू बेवारसपणे आढळून आले. ते पिल्लू ती स्नेहाच्या घरी घेऊन आली. त्या दोघींनी या पिल्लाचे नाव कुकी असे ठेवले. मात्र ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्नेहाला तिच्या आईने उठवले आणि कुकी सोसायटीबाहेर गेल्याचे सांगितले.
स्नेहा लगेच झोपेतून उठली आणि तिने कुकीचा शोध सुरू केला, मात्र अनेक तास शोध घेऊनही कुकीचा शोध लागला नाही. स्नेहाने इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये तिची आईच सकाळी सव्वाचारच्या सुमारास कुकीला इमारतीबाहेर नेत असल्याचे दिसले.
स्नेहाने जेव्हा याबद्दल आपल्या आईला विचारले तेव्हा कुकीला मी बाहेर घेऊन गेले, मात्र तो कुठे गेला हे माहीत नाही, असे उत्तर दिले. आई जाणीवपूर्वक श्वानाला बाहेर घेऊन गेली आणि त्याला रस्त्यात सोडले असा समज झाल्याने तिने आपल्याच आईिवरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.