नाशिक –
नाशिकमध्ये अयोध्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. मंदिरात जय श्री रामाचा जयघोष यावेळी करण्यात आला.
महाजन याप्रसंगी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यात राम राज्यच येणार आहे, थोडा धीर धरा वाट बघा असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे म्हणाले. ते आज काळाराम मंदिर परिसरात माध्यमांशी संवाद साधत होते.
अयोध्या निकाल सगळ्यांसाठी चांगला आहे. कोर्टानं निकालात संतुलन राखलं आहे. सर्वधर्मीयांनी या निकालाचे स्वागत केले आहे. हा निकाल म्हणजे कुणाची हार किंवा जीत नाही, दोन्ही धर्मियांचा निकालात विचार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून संबोधले जाणारे महाजन निवडणुक निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी राज्यातील सत्तानाट्यावरील परिस्थितीवर बोलले. राज्यात रामराज्यच येणार आहे, थोडी वाट बघा असे सांगून त्यांनी शिवसेनेला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.