पुणे : ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार देऊन, ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्याप्रकरणात अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (३२, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिला गुन्हे शाखेचा युनिट २ ने मुंबईतून अटक केली आहे. हा गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने ॲड. मिलिंद पवार व ॲड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता. अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून सारा श्रवण दुबईमध्ये पळून गेली होती. अभिनेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता. रोहिणी माने व यादव यांनी ‘रोल नंबर १८’ या चित्रपटात काम केले आहे.
यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिणी माने ही आपल्याशी लग्न कर यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. नंतर वानवडी पोलीस ठाण्यात सर्व आरोपींनी संगनमताने यादव विरुद्ध वानवडी पोलीस ठाण्याच्या वॉशरूममध्ये घुसून रोहिणी मानेची छेड काढली, असा खोटा आरोप करून विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. हे सर्व कटकारस्थान असल्याची तक्रार सुभाष यादव यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली होती.