अहमदनगर :- शहरातील साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश उत्तम चहाळ यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा जणांना डॉक्टर चहाळ यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गजांआड केले.
खंडणी म्हणून दिलेल्या पैशांच्या बॅगेमध्ये रद्दी कागद आढळल्यानंतर खंडणी मागणाऱ्या एकाने डॉक्टरवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली.
डॉक्टर चहाळ यांनी प्रसंगावधान दाखवून गोळी हुकवून स्वतःला वाचविल्याने अनर्थ टळला. अक्षय सुनील कुऱ्हाडे (रा. सलाबतपूर, नेवासा), नितीन मगाराम चौधरी (रा. सणसवाडी, शिरुर, पुणे), बाबू अरुण भुजबळ (रा. तळेगाव ढमढेरे, शिरुर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याविरुद्ध पारनेरमधील सुपा पोलिस स्टेशनला खंडणी मागणे, गावठी पिस्तूलमधून गोळीबार करून डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी कुऱ्हाडे डॉ. चहाळ यांच्या हॉस्पिटलमध्ये अडीच वर्षांपूर्वी फिजोयोथेरपिस्ट म्हणून नोकरीला होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी पत्रकार परिषदेत दिली.