शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमा फासणारे वर्तन,तीन रुग्णांना फेकले रस्त्यावर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सांगली :- मिरजेच्या शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारे वर्तन केले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तीन रुग्णांना कर्मचाऱ्यांनी डिस्चार्ज देतोय म्हणून सांगलीत रेल्वे स्टेशन परिसरातील जुना कुपवाड रोड, सुंदर पार्क येथील निर्जन रस्त्यावर रात्री आणून फेकले. 

यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शिवलिंग कुचणुरे (रा. गणेशवाडी ता. शिरोळ) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. हे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी, शिवलिंग कुचणुरे (रा. गणेशवाडी), ईशाद मोमीन (रा. मिरज) आणि शंकर मारुती शिंदे (रा. धारावी) हे गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त असल्याने त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. 

डॉक्टर या नात्याने रुग्णांवर उपचार करणे ही त्यांची जबाबदारी व कर्तव्य आहे. काही काळ त्यांच्यावर जुजबी उपचार केल्यानंतर या तिन्ही रुग्णांना शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देवून दुसरीकडे नेत आहोत, असे सांगून त्यांना रुग्णालयाबाहेर काढले.

त्यांना गाडीत घालून सांगलीच्या रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या निर्जनस्थळी रस्त्यावर आणून टाकण्यात आले. वेदनेने त्रस्त असलेल्या या रुग्णांना आपल्या हातापायांची हालचालही करता येत नव्हती. आजूबाजूला शंभर-सव्वाशे भटक्या कुर्त्यांची टोळी फिरत असलेल्या या ठिकाणी तिघेही मरणासन्न अवस्थेत पडले होते. 

काही वेळाने तीन लोकांचा खून करुन त्यांना या परिसरात आणून टाकल्याच्या चर्चेला उधाण आले. 
त्या तिघांची अवस्था अत्यंत वाईट होती. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. अन्न, पाण्याने व्याकूळ झालेल्या त्यांच्याशी बोलल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आला. काटकर यांनी याबाबत संजयनगर पोलीस ठाणे व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ही माहिती सांगितली.

 त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मुजावर यांच्या मदतीने त्यांच्याच वाहनातून तिघांनाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यातील एकजण इतका कमकुवत होता की, तो जागेवरुन हलण्याच्याही स्थितीत नव्हता.

अहमदनगर लाईव्ह 24