श्रीगोंदा : काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि.४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील बेलवंडी फाट्यावरील काळे मामा बिर्याणी हाऊस हे हॉटेल व त्यालगत असणारे घर पेटवून दिल्याची घटना घडली.
सदर घटनेबाबत रेखा संजय काळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्ता रामदास जाधव रा.(गव्हाणेवाडी) बेलवंडी फाटा, ज्ञानेश्वर शंकर कुरंदळे, सोपान शंकर कुरंदळे दोघे रा.आण्णापूर ता.शिरूर या तिघांविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत रेखा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदरील आरोपी व काळे यांचे काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. तेव्हा काळे कुटुंबियांनी या आरोपींविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सदर इसम हे काळेे कुटुंबीयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या धमकावत होते.
गुन्हा दाखल केल्याचा राग या आरोपींच्या मनात होता. दि.४ नोव्हेंबर रोजी काळे कुटुंबीय हे हॉटेल व घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तेे घराजवळ आले तेव्हा त्यांना त्यांचे घर व हॉटेल जळत असलेले दिसले.
परंतु हॉटेलमध्ये गॅस टाकी असल्यामुळे कुणीही घराजवळ गेले नाही. त्यामुळे या आगीत काळे कुटुंबीयांचे घर व हॉटेल जळून खाक झाले.
यामध्ये काळे यांचे २५ हजार रुपये रोख रक्कम, हॉटेलचे साहित्य महत्त्वाची कागदपत्रे सहा लाख रुपयांचे घर असे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर आग ही वरील तिन्ही आरोपींनी लावल्याचा आरोप काळे यांनी फिर्यादीत केला आहे.