श्रीरामपूर : गाडी बंद पडली म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाडीचालकास चाकू लावून त्याच्याकडील रोकड व मोबाईलसह गाडी पळवून नेण्याचा प्रकार काल रात्री ७ वाजता वडाळा महादेवजवळ घडला.
हिंद सेवा मंडळाचे मानस सचिव संजय जोशी यांच्या क्रिएटा गाडीत त्यांच्या पत्नी, मेहुणे व ड्रायव्हरसह औरंगाबादहून श्रीरामपूरकडे येत होते. सायंकाळी ७ वाजता वडाळ्याजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटला.
त्यामुळे जोशी पत्नी व मेहुण्याला घेण्यासाठी तेथे गेले. जाताना दुकानातील मुकेश यमे आणि आदिनाथ घुले यांना नेले व टायर बदलल्यावर ड्रायव्हरबरोबर येण्यासाठी त्यांना सूचना केल्या. त्यानंतर जोशी त्यांच्या कुटुंबियांना घेऊन श्रीरामपूरला आले.
गाडीचे टायर बदलल्यानंतर ड्रायव्हर व दुकानातील दोघे जण घटनास्थळावरुन निघालेच होते, की तेथे तिघे जण आले. त्यांनी ड्रायव्हरला चाकू लावला. दोघांकडून मोबाईल तसेच सुमारे १० हजार रुपये व गाडी घेऊन हे चोर हरेगाव रोडने शिरसगावकडे पळून गेले.
ही माहिती ड्रायव्हरने जोशी यांना सांगितली. जोशी यांनी नगरसेवक रवींद्र गुलाटी यांना कॉलेजच्या रोडने येण्यास सांगितले. तसेच हरेगावचे अनिल भनगडे यांनाही त्यांनी फोन केला. तेही हरेगावच्या दिशेने आले. याशिवाय जोशी यांनी पोलिसांनाही फोन केला.
पो.कॉ. गाडेकर, घुगे तातडीने घटनास्थळ धावले. चोरटे ही गाडी घेऊन शिरसगाव रोडने गेले. नंतर ब्राम्हणगावकडून निघून हरेगावच्या दिशेने गेले. हरेगावजवळ छल्लाणी यांच्या भिंतीवर गाडी आदळली. त्यानंतर चोर तेथून पळून गेले.