पारनेर :- पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याची खरमरीत टीका खासदार सुजय विखे यांनी बुधवारी केली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल व ही रक्कम एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
विखे यांनी पीकविमा कंपन्यांच्या कारभारावर सडकून टीका करत प्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. सरकार, पक्ष यांच्याशी मला काही घेणे-देणे नाही.
शेतकऱ्याला पक्ष नसतो. मी खासदार आहे. भाजपचा असलो, तरी माझी पहिली बांधिलकी शेतकरी वर्गाशी आहे. तो शेतकरी कोणत्याही पक्षाचा असो, मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कंपनीचा एकच प्रतिनिधी तालुकापातळीवर आहे. फळबागेच्या विम्याचा प्रतिनिधी जिल्ह्यातही सापडत नाही. लोक ऑनलाइन अर्ज करतात. त्यानंतर त्यांनी भरपाई मागायची कोणाकडे? लोकसभेच्या आगामी अधिवेशनात हा विषय मांडणार आहोत, असे ते म्हणाले.