अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात.
त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
नगर शहरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उड्डाणपुलाचा संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भूमिका अडसर ठरू पाहत आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर १०० टक्के भूसंपादन झाल्याखेरीज कार्यारंभ आदेश देऊ शकत नसल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मात्र, नगरकरांसाठी आणि नगर शहरातील वाहतुकीच्या सुव्यवस्थेसाठी रामबाण उपाय ठरणाऱ्या या उड्डाणपुलाचे काम तत्काळ सुरू व्हावे, अशी आग्रही भूमिका जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी घेतली आहे. तसेच यासंदर्भात रविवारी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की उड्डाणपुलाचा शब्द आपण निवडणुकीदरम्यान नगरकरांना दिला आहे. भविष्यकाळाचा विचार करता उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाचा विषय आपण प्राधान्यक्रमाने हाती घेतला.
मात्र, मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना धीर देणे या काळात महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आपण दौऱ्यावर आहोत. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असता, खा. विखे पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश ९० टक्के भूसंपादनाचे काम झाले की वर्क ऑर्डर निघू शकते. याच दृष्टीने नगरमधील उड्डाणपुलासाठी ९० टक्के भूसंपादन झाले, की कार्यारंभ आदेश निघतील.
जमीन अधिग्रहण व्हायची आहे, म्हणून काम थांबणार नाही. या उड्डाणपुलासाठी लष्कराची काही जमीन संपादित करणे आवश्यक आहे. आता लवकरच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, या अधिवेशनादरम्यान आपण दिल्ली येथे ठाण मांडून बसणार आहोत.