अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे :- भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीत एका युवकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथील चैतन्य आल्हाट याला अटक झाली होती.
२९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. मात्र, घरी आल्यावर तो आजारी पडला. त्याचा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये २३ डिसेंबरला मृत्यू झाला.
भीमा कोरेगावप्रकरणी संशयित म्हणून पारगाव येथील तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे तिघे दोन वर्षांपासून येरवडा कारागृहात होते. २९ नोव्हेंबरला चैतन्यसह आणखी एकाची जामिनावर मुक्तता झाली होती.
त्याच्याआधीपासून चैतन्य आजारी असल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला सर्दी होऊन ताप येत होता. ६ डिसेंबरला पारगावला आल्यानंतर त्याची तब्येत खालावली.
२२ डिसेंबरला चैतन्यला चक्कर येऊन तो खाली पडला. नातेवाईकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्याला मोठ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितले. नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता तेथे त्यास ससूनमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.
२२ डिसेंबरला चैतन्यला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. जिवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे चैतन्यच्या फुफ्फुसात प्रादुर्भाव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.