अकोले : आकर्षक रंगित लग्नपत्रिका, त्यात प्रमुख उपस्थित अतिथी, कार्यवाहक, आशिर्वाद देणाऱ्यांची आणि प्रेक्षकांची भली मोठी यादी, सोबत मामा व मित्र परिवाराचा उल्लेख, घरोघरी जाऊन दिलेले प्रत्यक्ष निमंत्रण, सनईचे मंजुळ सूर, ढोल ताशांचा नाद, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचे सत्कार, वऱ्हाडी मंडळीची लगबग,
नटलेल्या करवल्यांची लुडबुड, स्वागतासाठी दरवाजात उभे असणारे यजमान, अंगावर शिंपडले जाणारे अत्तर, आलेल्या प्रत्येक महिलेच्या केसात गजरा, पुरुषांना लावले जाणारे गंध, आकर्षक रितीने मांडलेला रुखवत, चढाओढीने गायिलेली हळदीची गाणी, वधुवरांची निघालेली भव्य मिरवणूक आणि लग्नात भक्ती संगीत, मोतीचूर बुंदी लाडू व चिवड्याची मेजवानी,
अक्षदांच्या बरोबरीने फुलांची उधळण, आहेर स्विकारण्याकरता उडालेली धांदल, लग्नानंतर लगेचच जागरण गोंधळ या सगळ्यात सर्व काही अगदी घरचेच कार्य आहे, असे समजून राबणारे महिला आणि पुरुष कार्यकर्ते, सामान्य नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ते नवनिर्वाचित आमदार यांच्यापासून हजारो नागरिकांची उपस्थिती, असे हे भव्य वर्णन कोणा राजकीय पुढाऱ्याच्या घरातील लग्नाचे नसून अकोले तालुक्यातील कोतूळ येथे रविवारी गोरज मुहुर्तावर संपन्न झालेल्या नगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तुळशी विवाहाचे आहे.
सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थान व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळ, कोतूळ (ता. अकोले) यांच्या वतीने हा अनोखा विवाह सोहळा गणपती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
या वेळी आमदार डॉ.किरण लहामटे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह प्रमोद लहामगे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सयाजी देशमुख, रामनाथ महाराज जाधव, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सुनिल राऊत, शशिकांत शिंदे, भाऊसाहेब देशमुख,
भाऊसाहेब गिते, शिक्षक बँकेचे संचालक गंगाराम गोडे, कैलास नेवासकर, उत्तम देशमुख, दत्तात्रय दुटे, संकेत आरोटे, रमेश देशमुख, एकनाथ आरोटे, काशिनाथ पोखरकर, वसंतराव देशमुख, अरूण पोखरकर, शरद बनसोडे, सुनिल पाबळकर, नंदू कानकाटे, सुनील काळे, दत्तात्रय फुलसुंदर, विठ्ठल शेळके यांच्यासह भाविक उपस्थित होते.
स्वरा नेवासकर हिने अतिशय सुमधुर भक्तिगीताने वातावरण भारावून टाकले. अजित दिघे यांनी व्याख्यानाद्वारे हिंदू धर्माची महती विषद केली. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी स्वागत केले.