मागील दहा वर्षांत त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सोडवला नाही!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

तिसगाव – पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी दिली.

पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांचा दौरा आमदार तनपुरे करत आहेत. तिसगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती संभाजीराव पालवे होते. तनपुरे यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. 

ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या सभेत आमदार तनपुरे म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांमधून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचीच मागणी अग्रक्रमाने करण्यात येत आहे. मागील दहा वर्षांत साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मागील लोकप्रतिनिधीला सोडवता आला नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

तिसगावसह या सर्व गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपण निश्चित मार्गी लावू. एकाच वेळी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे जादूची कांडी नाही. मात्र, दिलेला शब्द व माझ्यावर टाकलेला विश्वास निश्चित सार्थ ठरवू. तिसगाव येथील महिलांसाठी लघुउद्योग सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. 

मिरी-तिसगाव प्रादेशिक योजनेचे पाणी तिसगावपर्यंत पूर्ण दाबाने देण्यातील सर्व अडथळे दूर करू, असेही तनपुरे म्हणाले. 

या वेळी शिवसेना तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल रांधवणे, सरपंच अमोल वाघ, माजी उपसरपंच इलियास शेख, रफिक शेख, सुनील पुंड, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे, नाथा वाबळे, पापाभाई तांबोळी, संतोष बोरुडे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24