वैजापूर- तालुक्यातील माळी घोगरगाव येथील बेपत्ता असलेल्या विवाहितेने सहा महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.९) सकाळी समोर आली. मायलेकी शुक्रवारपासून घरातून बेपत्ता होत्या. राणी भगवान जगधने (२१) व वैष्णवी भगवान जगधने (६ महिने) अशी या मायलेकींची नावे आहेत.
वीरगाव पोलिसांनी सांगितले, की भगवान जगधने यांची पत्नी राणी व मुलगी वैष्णवी शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होत्या. रात्रभर त्या घरी न आल्याने शनिवारी सकाळी भगवान यांनी वीरगाव पोलिसांत धाव घेत पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
पोलिसांनी परिसरात दोघींचा शोध सुरू केला. त्याचवेळी जगधने यांच्या माळी घोगरगावातीलच शिवारातील (गट क्र.१९४) शेतातील विहिरीत लहान मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एच. पी. पालेपवाड, दीपक बर्डे यांच्यासह पथकाने तत्काळ धाव घेतली.
पोलिसांनी स्थानिकांना विहिरीत उतरवून त्या मुलीला बाहेर काढल्यावर ती वैष्णवी असल्याचे स्पष्ट झाले, तर विहिरीतच शोध घेतल्यावर राणी यांचाही मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघींच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.