श्रीरामपूर – श्रीरामपूर बाजार समितीत गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची एकहाती सत्ता असताना ना. विखे यांनी सर्व संचालकांशी चर्चा करून एकमताने नवीन सभापती व उपसभापतींची निवड केली.
नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानून सभापती व उपसभापती यांच्या विरोधातील अपात्रतेच्या कारवाया थांबवणे अत्यावश्यक असताना त्या कारवाया तशाच सुरू ठेवल्याने एकप्रकारे बाजार समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी ना. विखे यांचा आदेश डावलला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बाजार समितीच्या सभापतीपदी संगिता नाना शिंदे यांची तर उपसभापतीपदी नितीन सुंदरभान भागडे यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीच्या आदल्या दिवशी ना. विखे यांनी सर्व संचालकांशी व्यक्तीगत चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला. परंतु तरीही लॉबिंग सुरू असल्याचे लक्षात आल्याने स्वतः ना. विखे निवडीच्या दिवशी श्रीरामपुरात आले होते.
त्यामुळे निवडी सुरळीत पार पडल्या. विखे यांची बाजार समितीत एकहाती सत्ता आहे. विखे यांच्या आदेशावरुन सचिन गुजर यांनी राजीनामा दिला होता. ससाणे गटानेही शिंदे यांच्या नावाला विरोध न करता संमती दिली. दरम्यान सभापती संगिता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, डॉ. नितीन आसने, मुक्ताजी फटांगरे, राजेंद्र तोरणे या पाच संचालकांच्या विरोधात दूध संघाचे माजी संचालक विष्णुपंत खंडागळे यांनी अपात्रतेची कारवाई करावी म्हणून जिल्हा उपनिबंधकांकडे आणि त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात तक्रार दाखल केलेली आहे.
खंडागळे आणि पटारे हे एकमेकाचे सहकारी आहेत. त्यामुळे सभापती, उपसभापती यांच्यासह पाच विद्यमान संचालकांविरोधात केलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात, असे आदेश नुकतेच ना. विखे पाटील यांनी पटारे यांना दिल्याचे समजते. परंतु हा आदेश पटारे यांनी डावलल्याचे समजते. विशेष म्हणजे उपसभापती असणारे नितीन सुंदरभान भागडे हे विखे पाटील यांचे कट्टर समर्थक व निकटवर्तीय आहेत.
त्यामुळे विखे यांचे कट्टर समर्थकाची निवड झालेली असताना आणि त्यांच्या विरोधातील तक्रारी, केसेस काढून घेण्याचे सांगितलेले असताना तो आदेश पटारे यांनी पाळला नसल्याचे समजते. त्यामुळे नूतन सभापती आणि उपसभापती यांच्यावरची अपात्रतेची तलवार तशीच टांगती आहे.
बाजार समितीत विखे यांचे निर्विवाद वर्चस्व असूनही आणि त्यांच्या संमतीने एकमताने निवडी झालेल्या असताना पटारे यांनी त्यांचा आदेश डावलल्याने तालुक्यात याची जोरदार चर्चा आहे. कारण एकप्रकारे आता पटारे यांनी ना. विखे यांची नाराजीच ओढून घेतल्याचे या निमित्ताने मानले जाते.