संगमनेर :- तालुक्यातील पानोडी येथील महेश रामनाथ पवार (वय २७) या तरुणाचा बुधवारी (२ ऑक्टोबर) सकाळी येथील केटी वेअरमध्ये पाय घसरुन पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पानोडी शिवारातील बाभूळदरा येथे महेश पवार हा तरुण आपल्या आई- वडिलांसमवेत शेतात सोंगणीच्या कामासाठी गेला होता.
यावेळी एक हजार फूट अंतरावर असणाऱ्या केटी वेअरवर तो हात- पाय धुण्यासाठी गेला. केटी वेअरवर व परिसरात पाऊस झाल्यामुळे शेवाळ तयार झालेले असल्याने त्याचा महेशला अंदाज आला नाही. त्यामुळे शेवाळावरून पाय घसरुन तो पाण्यात पडला.
बराच वेळ झाला तरी महेश आला नसल्याने वडील रामनाथ पवार यांनी तेथे जाऊन पाहिले असता महेश पाण्यात पडल्याचे लक्षात आले. प्रसंगसावधान राखत त्यानी शेतात सोंगणीचे काम करणाऱ्यांना आवाज दिला. सर्वांनी महेशला पाण्यातून बाहेर काढत संगमनेर येथील रुग्णालयात नेले; तेथे डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले.
महेश हा एमएससी, बीसीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला होता. त्याच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत असून मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले आहेत.