समुद्रात प्रेमीयुगुल बुडाले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : वांद्रे येथे बॅण्डस्टँडच्या समुद्रात खडकावर बसलेले एक युगुल दुपारच्या सुमारास समुद्रात खेचले गेल्याने बेपत्ता झाले. पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी शोध घेतला असता तरुणी अत्यवस्थ अवस्थेत सापडली.

तिच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. दरम्यान, तरुण अजून बेपत्ताच आहे.. हे युगुल बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यापासून १५० ते २०० फुटांवर असलेल्या खडकावर बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या उंच लाटेने त्यांना समुद्रात खेचून घेतले. 

स्थानिकांनी हा प्रसंग पाहताच पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्यांनी तरुणीला बाहेर काढून खासगी वाहनाने भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बेपत्ता युवकाचा कोळी बांधव, लाईफ गार्ड यांच्याकडून कसून शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला नेव्ही आणि कोस्टगार्डला पाचारण करण्यात आले. 

मात्र त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या युवतीचे नाव प्रीती गुप्ता (२०) असून तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.. बॅण्डस्टँड किनाऱ्यानजीक समुद्रात खडकावर जाऊन बसणे धोकादायक आहे, अशा सूचनेचे फलक लावण्यात आले आहेत.

 मात्र पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या जिवावर बेतते, असे स्थानिक कोळी बांधव आणि पोलिसांकडून सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24