‘शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा आणि उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा’!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नाशिक : राज्याच्या सत्तासंपादनाच्या सारीपाटातील डाव-प्रतिडाव सुरू असतानाच शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदासह सोळा मंत्रिपदं घ्यावीत, असा अनाहूत सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री आठवले व पालकमंत्री महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

सध्याची राजकीय परिस्थितीही आठवले यांनी आपल्या शैलीत काव्यबद्ध केले. ‘शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा आणि उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा’, असे आठवले म्हणाले. तेव्हा हंशा पिकला.

शिवसेनेने समसमान जागा व पदांचा फॉर्म्युला आणला आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. ही मागणी अयोग्य असल्याचे मत नोंदवित आठवले यांनी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे अधिक आमदार निवडून आले असते, तर आम्ही स्वत:च त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असता, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक करणार असेल, तर माझेही शरद पवार यांच्याशी चांगले संबंध असून, आमदारांचे संख्याबळ गोळा करण्यात गिरीश महाजन यांचा हातखंडा असल्याचा इशाराही त्यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24