श्रीरामपूर : तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी काल खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय कृषी अधिकारी कातोरे, प्रांताधिकारी पवार यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते. बैठकीला सर्व मंडलाधिकारी देखील उपस्थित होते.
तालुक्यात परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी आदी पिके पाण्याखाली गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
काही शेतकऱ्यांचा चाळीतील कांदाही पावसामुळे सडला आहे. पावसात भिजल्याने पिकांना मोड फुटले असून, वेचणीला आलेला कापूसही भिजल्याने नुकसान झाले आहे. याचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शासन काहीही निर्णय घेवो. मात्र, आपल्याकडून कोणाचाही पंचनामा राहता कामा नये, अशा सूचना खासदार लोखंडे यांनी दिल्या. प्रशासनाने गावातील गटातटाकडे न पाहता पंचनामे करावे, अशाही सूचना लोखंडे यांनी केल्या. पूरग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे खा. लोखंडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.