जिल्ह्यातील दिग्गज नेते मानल्या जाणाऱ्या राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी शिर्डी व संगमनेर या विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य कौटुंबिक संघर्ष अखेर टाळला. संगमनेरात थोरातांविरोधात विखे कुटुंबातील कोणीही उभे राहिले नाही, तर तिकडे शिर्डीत विखेंविरोधात थोरातांच्या कुटुंबातील कोणीही अर्ज भरला नाही. यावरून विखे व थोरातांनी अनुक्रमे शिर्डी व संगमनेरमध्ये एकमेकांना ‘बाय’ दिल्याची चर्चा आहे.
संगमनेरात थोरातांविरुद्ध उमेदवारी करण्यासाठी विखेंनी पत्नी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांचे नाव पुढे आणले होते. त्यामुळे शिर्डीत विखेंविरोधात उमेदवारी करण्यासाठी थोरातांनी आपले मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांचे नाव चर्चेत आणले. या दोन्ही नावांतून एकमेकांना आजमावण्याची खेळी सुरू होती, हे आता स्पष्ट झाले आहे. एकमेकांविरोधात घरातील उमेदवार असते तर संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले असते पण असे झाले नाही . आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी मात्र झडतील हे मात्र नक्की!
विखेंचे चिरंजीव डॉ. सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर मतदारसंघाची खासदारकी पटकावल्यावर व त्याचवेळी शिर्डी मतदारसंघातून सेनेचे सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यातही यश मिळवल्यावर खुद्द विखेंनीच आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १२-० यश मिळवण्याचा दावा केला होता. त्यानंतर अकोल्यातील ‘राष्ट्रवादी’चे आमदार असलेल्या वैभव पिचड यांना भाजपमध्ये आणले व श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत पाठवले. यावरून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत युतीला विजय मिळवून देण्याचे त्यांचे मनसुबे स्पष्ट झाले होते.
अशा स्थितीत संगमनेरला थोरातांना मात देण्यासाठीच्या त्यांच्या खेळीची उत्सुकता होती. त्यानंतर स्वतःचे संपर्क कार्यालयही तेथे सुरू करून कुटुंबातील सदस्यालाच थोरातांविरोधात तेथे उतरवण्याची त्यांची तयारीही सुरू असल्याच्या चर्चेने संगमनेर मतदारसंघ ‘हॉट’ झाला होता.
दुसरीकडे विखेंच्या या हालचालींना पायबंद घालण्यासाठी थोरातांनीही विखेंच्या शिर्डी मतदारसंघात आपल्या कुटुंबातील सदस्याला विखेंच्या विरोधात उतरवायची चर्चा घडवली व या चर्चेने शिर्डी मतदारसंघही राजकीयदृष्ट्या ‘हॉट’ ठरवला; पण या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात विखेंनी संगमनेर तालुक्यातील मालदाडचे रहिवासी साहेबराव नवले यांना थोरातांसमोर उभे केले, तर तिकडे थोरातांनी आपल्याच जोर्वे गावचे रहिवासी सुरेश थोरात यांना विखेंना आव्हान देण्यासाठी तयार केले.
यावरून विखे व थोरातांनी एकमेकांविरुद्ध राजकीयदृष्ट्या कमकुवत उमेदवार देऊन एकमेकांना मदत करण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. दोन्हीकडून एकमेकांविरुद्ध कुटुंबातील सदस्य उतरवून कौटुंबिक संघर्ष करण्यापेक्षा एकमेकांना सावरून घेत कौटुंबिक वादविवाद दोघांनीही टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
विखेंनी शिवसेनेच्या तिकिटावर संगमनेरातून बाळासाहेब थोरातांविरुद्ध उभे केलेले साहेबराव नवले यांनी याआधी थोरातांविरुद्ध जनता दलातर्फे एकदा निवडणूक लढवली आहे. तर दुसरीकडे शिर्डीत विखेंविरोधात उभे राहिलेले सुरेश थोरात बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावचे रहिवासी आहेत. उमेदवार मा.जि. प सदस्य सुरेश थोरात हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत. या नात्यागोत्यांच्या राजकरणामुळे नगर जिल्ह्याच्या राजकरारनाला चांगली फोडणी मिळते .