नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या दिग्गज उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांकडे आहे. रोहित यांच्याकडे तब्बल ५४ कोटी ७८ लाखाची तर त्याखालोखाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे २४ कोटी ७८ लाखाची संपत्ती आहे.
भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक १७ कोटी ४० लाखांची सपत्ती आहे. गुरुवारी जिल्ह्यातील दिग्गज उमे दवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात उमेदवारांनी त्यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम संपत्तीची माहिती दिली आहे.
उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे बारामतीचे असलेले व नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार व त्यांच्या पत्नीकडे एकत्रित ५४ कोटीची संपत्ती आहे. त्यात दोघांकडे २५ कोटीची जंगम मालमत्ता आहे.
दोघांकडे मिळून तब्बल ३ किलो १०० ग्रॅम सोने आहे. रोहित पवार हे महागड्या घड्याळाचे शौकिन असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांची २८ लाखाची ५ घड्याळे आहेत. पत्नीकडेही ७ लाखांचे एक घड्याळ आहे. भाजपचे राधाकृष्ण विखे व त्यांच्या पत्नी शालिनी विखे यांची एकत्रित सुमारे २५ कोटींची संपत्ती आहे. विखे यांच्याकडे राहाता, नेवासा, संगमनेर येथे शेतजमीन आहे. मुंबई व दिल्ली येथे घर आहे.
पालकमंत्री प्रा. राम शिंदेंकडे अवघी २ कोटी ४२ लाखाची संपत्ती आहे. कोपरगावच्या स्नेहलता कोल्हेंकडे १३ कोटी ३५ लाख , नगर शहरातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगतापांकडे १० कोटी ४२ लाख,
अनिल राठोडांकडे ४ कोटी २३ लाख व विजय औटींकडे ३ कोटी ८ लाखाची संपत्ती आहे. याशिवाय या उमेदवारांपैकी पाचजण पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तर दोघे दहावीपर्यंत शिकलेले आहेत.
पाचजणाविरुद्ध एकही गुन्हा नाही तर तिघांविरुद्ध कमीतकमी एक व जास्तीतजास्त २८ गुन्हे दाखल आहेत.