धक्कादायक! राज्यातील तब्बल ३२२ तरुणी करत होत्या दहशतवादी संघटनांना फॉलो

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ‘एसटीएस’कडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यातूनच गेल्या तीन वर्षांपासून दहशतवादी संघटनांना फॉलो करणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या तरुण-तरुणींना शोधून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

औरंगाबादसह राज्यातील काही शहरांत दहशतवादी संघटना तरुणांबरोबरच तरुणींनादेखील जाळ्यात ओढून दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. यात इस्लामिक संघटनांसह हिंदुत्ववादी संघटनांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील ३२२ तरुणी दहशतवादी संघटनांना फॉलो करत होत्या. काही संपर्कातही होत्या. त्यांना शोधून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) समुपदेशन केले.

जानेवारी ते ऑगस्ट २०१९ दरम्यान मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने त्यांचे समुपदेशन केल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ६३ तरुणी इस्लामिक दहशतवादी संघटनांशी तर २५९ तरुणी हिंदुत्ववादी संघटनांना फॉलो करत होत्या.

शहरात शाईन संघटनेशी निगडीत असलेल्या आठ मुस्लिम तरुणींचे एटीएसच्या महिला अधिकाऱ्यांनी उलेमा आणि मौलवींच्या उपस्थितीत समुपदेशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. समुपदेशन करण्यासाठी पुणे येथील एटीएसच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शहरात पाठवण्यात आले होते.


समुपदेशन प्रक्रियेत स्थानिक एटीएसला दूर ठेवण्यात आले होते हे विशेष. केवळ कोणत्या महिलांची चौकशी करण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आले एवढीच माहिती स्थानिक एटीएसला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणींचे येत्या डिसेंबरमध्ये समुपदेशन होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24