पारनेर –
नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारची रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. चौघेही पारनेर तालुक्यातील सुपे येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये सुपे येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, उद्योजक संदीप पवार यांचा समावेश आहे.
संदीप किसन पवार (४२), भरत भाऊसाहेब नन्नवरे (२२, दोघेही सुपे) व श्रीकांत गजानन गायकवाड (२४, मूळ चिचोंडी पाटील, ता. नगर, हल्ली सुपे) यांचा मृतांत समावेश आहे. साहिल समदखान पठाण (२२) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्याला पुण्याला हलवण्यात आले.
शिवसेनेचे समर्थक असलेले पवार बुधवारी दुपारी पारनेर येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेस कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. सुप्यातील कामे आटोपून भरत नन्नवरे, श्रीकांत गायकवाड, साहिल पठाण यांना घेऊन स्विफ्ट कारमधून ते नगरला गेले. तेथील काम आटोपून ते सुप्याकडे परत निघाले. मध्यरात्री एकच्या सुमारास चास शिवारात फलके फार्मसमोर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला त्यांच्या कारची जोराची धडक बसली.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद-पुणे मार्गावर सध्या सीएनजी गॅस पाइपलाइनचे काम सुरू असून ही पाइपलाइन रस्त्यालगत असल्यामुळे नादुरुस्त ट्रकचालकाला वाहन रस्त्यावर उभे करावे लागले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पवार व नन्नवरे जागीच ठार झाले होते. गायकवाड व पठाण हे दोघे गंंभीर जखमी होते. त्यांना नगरला हलवण्यात आले. वाटेतच गायकवाडचे निधन झाले.
शवविच्छेदन झाल्यानंतर पवार यांच्यावर पवारवाडी येथे, नन्नवरे यांच्यावर सुपे येथे, तर गायकवाड यांच्यावर चिचोंडी पाटील येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.