नगर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी हटके जाहीरनामा आणि वचननामा प्रकाशित केला आहे. शहरातील सर्वसामान्य मतदारांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले असून यातील हटके असणाऱ्या वचननाम्यामुळे शहरात चौका-चौकात कुजबुज सुरु झाली असून नगरकर मतदारांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
जाहीरनामा :
नगर शहराला “औद्योगिक शहर-उद्योग नगरी” म्हणून निर्माण करणार हा विषय घेत काळे यांनी* शहरातील एमआयडीसीचे प्रश्न, तरुणांच्या हाताला रोजगार, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे समूळ उच्चाटन करणे, दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करणे, उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणे, दिल्ली मॉडेलच्या धर्तीवरती मोहल्ला क्लीनिकची उभारणी करणे, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे यांचा प्रामुख्याने समवेत आहे.
तसेच नेहरू मार्केट, शरण मार्केट आणि यासारख्या अनेक मार्केटमध्ये गाळेधारकांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे गाळे उपलब्ध करून देणे, संगीत-कला-नाट्य-चित्रपट-साहित्य आदी क्षेत्रातील लोकांसाठी नाट्यगृहाची उभारणी करणे, व्यापाऱ्यांची पिळवणूक करण्यात जीएसटी कायद्याच्या विरोधात शासनावर दबाव आणणे, उद्योजक-लघुउद्योजक-इंजिनिअर्स-डॉक्टर्स-आर्किटेक आदींचे प्रश्न सोडवणे, प्रवासी आणि कार्गो विमानतळाची उभारणी करणे, कचरामुक्त शहर करीत स्वच्छ आणि सुंदर नगर शहराची निर्मिती करणे, महिला सक्षमीकरणासाठी काम करणे अशा अनेक विषयांचा देखील समावेश काळे यांनी आपल्या जाहीरनाम्यात केला आहे.
विधानसभा उमेदवाराचा आगळा वचननामा
आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच उमेदवाराने आपला वचननामा देखील प्रकाशित केला आहे. किरण काळे यांनी आपला २१ कलमी वचननामा प्रकाशित करताना आपण या शहरासाठी काय-काय करणार आहोत या बरोबरच एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय-काय नाही करणार याचा देखील वचननामा जाहीर केला आहे.
या वचननाम्यात त्यांनी पुढील गोष्टी जाहीर केल्या आहेत :
मी कधीही जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.
मी कधीही शहरातील तरुण आणि नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणार नाही.
मी कधीही राजकीय स्वार्थासाठी कोणाची हत्या अथवा कटकारस्थान करणार नाही.
मी कधीही नगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही.
मी कधीही शहरातील तरुणांना गुन्हेगारी विश्वात ढकलून त्यांचे आयुष्य बरबाद करणार नाही.
मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे संघटन करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही.
मी कधीही कोणाचीही कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही.
मी कधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून भ्रष्टाचार करणार नाही.
मी कधीही स्वतः आणि माझ्या सहकार्यांचा मार्फत सर्वसामान्य नगरकरांवर अन्याय आणि त्यांचे शोषण करणार नाही.
मी कधीही राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली करून शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही.
मी कधीही कुठल्याही कामात टक्केवारी खाऊन माझे स्वतःचे घर भरणार नाही.
मी कधीही भावनिक राजकारण करणार नाही.
मी कधीही सत्तेसाठी धर्माचे बेगडी प्रेम दाखवत धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजणार नाही.
मी कधीही सेटलमेंटचे राजकारण करून नगरकरांची प्रतारणा करणार नाही.
मी कधीही सत्ता लालसेपोटी मनपा निवडणुकीत अभद्र युती करून मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही.
मी कधीही भयमुक्त नगरचा खोटा नारा देत त्यावर राजकीय पोळी भाजणार नाही.
मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून कामगारांचे शोषण करणार नाही.
मी कधीही एमआयडीसीतील उद्योजकांना खंडणी मागणार नाही.
मी कधीही उद्योजकांना मारहाण करून शहरातून कंपन्यांना पळवून लावीत नगरकरांचा रोजगार हिरावून घेणार नाही.
मी कधीही पत्रकारांना मारहाण करणार नाही.
मी कधीही मनपा अधिकाऱ्यांना चप्पल फेकून मारणार नाही.