पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत :- सामान्य घरात जन्मलेल्या राम शिंदे यांना कर्जत-जामखेडच्या जनतेने नेता बनवले. ते लादलेले नेतृत्व नाही, तर घडवलेले आहे. समोरचा उमेदवार जरी धनधांडगा असला तरी लोकशाही धनधांडग्यांची नाही. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते. 

मतदारांनी शिंदेंसारख्या सामान्य नेतृत्वाला संधी देऊन मावळच्या जनतेने जसे पार्थचे पार्सल परत पाठवले, तसे रोहितचे पार्सल परत बारामतीला पाठवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. 

मंत्री राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ सिध्दटेक येथे मुख्यमंत्र्यांनी फोडला. सिध्दिविनायकाचे दर्शन घेऊन त्यांनी श्रीफळ वाढवला. 

यावेळी शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष नामदेव राऊत, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, राजेंद्र नागवडे, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, मनोज कुलकर्णी, कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर, भाजप तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, रवींद्र सुरवसे, आशा शिंदे आदी उपस्थित होते. 

ही निवडणूक धनदांडग्यांची नाही. पैशांच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या, तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हे निवडणुका जिंकले असते, असा टोला फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांना लगावला. शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबात घडलेले नेतृत्व आहे. ते शिकले, प्राध्यापक झाले.

 त्यानंतर आमदार, मंत्री झाले.जनतेच्या जोरावरच ते निवडणूक लढवत आहेत. गतवेळी ते ३८ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी त्यांना ५० हजार मतांनी निवडून द्या. आमचा रामभाऊ कलाकार माणूस आहे. हा काही साधा गडी नाही. तो भल्याभल्यांना पुरून उरला आहे. 
रामभाऊंनी शेतकऱ्यांसाठी मोठी कामे केली. ३९०० कोटींची कुकडी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. तुकाई चारी योजना, शासकीय कृषी महाविद्यालय आणले.

यापुढेही ते याच पध्दतीने काम करत राहतील. त्यांच्यामागे उभे रहा, असे फडणवीस म्हणाले. माजी मंत्री सुरेश धस म्हणाले, राष्ट्रवादीची अवस्था दिल के टुकडे हजार हुए; कोई इधर गिरा, कोई उधर या गाण्यासारखी झाली असून कोणी या पक्षात, तर कोणी त्या पक्षात प्रवेश करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24