पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे ;- एकमेकांच्या विरोधात राजकीय लढत देणारे पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात म्हणजे भाजपत आले आहेत. सिद्धटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे बंधू दीपक यांनी कमळ हातात घेतले. 

शिवाजीराव नागवडे विरुद्ध बबनराव पाचपुते असा संघर्ष तालुक्याने अनेक वर्षे पाहिला. घोड नदीकाठच्या गावांत नागवडे परिवाराला मानणारे कार्यकर्ते आहेत. काष्टी, बेलवंडी गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुराधा नागवडे निवडून आल्या आहेत. कोळगाव, तसेच आढळगाव गटासह श्रीगोंदे शहरात नागवडे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. 

शिक्षण संस्था, साखर कारखाना यामुळे नागवडेंचे राजकीय वर्चस्व टिकून आहे. ते स्वतः विधानसभेची तयारी करत होते, मात्र राजकीय परिस्थितीत त्यांची अडचण झाली होती. २०१४ मध्ये बबनराव पाचपुतेंनी भाजपत येत विधानसभा लढवली. त्यांच्या विरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले. शिवाजीराव नागवडे व कुंडलीकराव जगताप यांनी पवारांच्या आदेशाने तालुक्यात केलेल्या आघाडीने पाचपुतेंचा पराभव केला, पण पाच वर्षे पाचपुते भाजपमध्येच राहिले. 

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाने आमदारकीसाठी भाजपचे तिकिट मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे प्रयत्न करत होते. मात्र, भाजपने पाचपुतेंना तिकिट दिले. अनुराधा नागवडे यांनी अपक्ष अर्ज भरला होता, मात्र खासदार विखे यांनी आश्वासन दिल्याने नागवडेंनी माघार घेतली. 

सिद्धटेक येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागवडे बंधुसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, बाजार समिती सभापती धनसिंग भोईटे यांनी भाजपत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजेंद्र नागवडे व त्यांचे बंधू दीपक नागवडे यांनी शुक्रवारी प्रवेश केला

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24