कर्जत – राशीन भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, मनसेचे अप्पासाहेब पालवे यांच्यासह अपक्ष बजरंग सरडे, ज्ञानदेव सुपेकर यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी त्यांना नोटीस बजावली.
विहित नमुन्यात खर्चाचा सर्व हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवारी खर्च निरीक्षक नागेंद्र दीक्षीत यांच्या उपस्थितीत कर्जत येथील जुन्या तहसील कार्यालयात झाली.
१० उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील निवडणूक खर्च सादर केला. शिंदे, पवार, पालवे, सरडे व सुपेकर यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळली. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ४८ तासांत खुलासा आणि पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.
सोमनाथ भागचंद शिंदे व राम रंगनाथ शिंदे हे उमेदवार उपस्थित नसल्याने त्यांना अनुपस्थितीबाबत नोटीस बजावण्यात आली.