महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा आहे. महापाैर वाकळे यांनी प्रदेशकडे बोट दाखवत सध्या बाहेर प्रचार सुरू असल्याचे सांगत बोलावल्यास शहरातही सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले. 

महापालिकेत राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपचे वाकळे हे महापौरपदी विराजमान झाले. ते विधानसभेसाठीही इच्छुक होते. एकीकडे शहराची जागा शिवसेनेकडे असताना ही जागा भाजपला घ्यावी, यासाठी त्यांनी जोर लावला होता. 
पुढे उमेदवारी निश्चित होऊन युती धर्म पाळण्याचे ठरले, पण भाजप व शिवसेनेतील काही स्थानिक नेत्यांचे पटत नसल्याचे चित्र कायम आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राठोड यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेला महापौर वाकळे यांनी हजेरी लावली होती. 
भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. असे मोजके प्रसंग सोडले, तर महापौर वाकळे प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसत आहे. प्रदेशकडे बोट दाखवून ते जिल्हाभरात प्रचारात करत असल्याचे सांगत आहेत. मी प्रचारात सक्रीय असून स्वतंत्रपणे युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24