पापाची फेड करण्याची वेळ आली : खासदार डॉ. विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी ;- राष्ट्रवादी काँग्रेस ही व्हाॅटस् एपची लाभार्थी झाल्याने सभेला भाडोत्री माणसे आणण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असा टोला खासदार डाॅ. सुजय विखे यांनी लगावला. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ रविवारी नवीपेठेत आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी शिवाजी सोनवणे होते. ईडीची चौकशी लागली त्यांना मोकाट सोडायचे, असा सवाल करत केलेल्या पापाची फेड करण्याची ही वेळ असल्याचे विखे म्हणाले. अनेक वर्षे सत्ता असताना प्रस्थापित पुढाऱ्यांना पाणी, आरोग्य व शिक्षणाची पुरेशी सोय करता आली नाही. 

प्रत्येक सात-बाऱ्यावर आपलेच नाव ही भूमिका असल्याने राहुरीचा विकास खुंटला, अशी टीका विखे यांनी केली. आमदार कर्डिले यांची मोलाची मदत झाल्याने बंद पडलेला तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होऊ शकला, असे त्यांनी नमूद केले.

कर्डिले म्हणाले, ४० वर्षे सत्ता देऊनदेखील प्रश्न सुटले नसल्याने जनतेच्या पदरी निराशा पडली. रस्ते, पाणी व आरोग्याचे गंभीर प्रश्न असलेले शहर म्हणून राहुरीची ओळख झाली आहे. 

२००९ पर्यंत राज्यात व देशात सरकार असताना शहराची सुधारित पाणी योजना भिजत पडली होती. शहरातील लोकसंख्यावाढीचा विचार सत्ताधारी मंडळींकडून झाला नसल्याने ही वेळ आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला. मात्र, विरोधी मंडळींकडून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24