जामखेड दहा वर्षांत मी कोणालाही त्रास दिला नाही, त्यामुळे मला त्रास होत आहे. आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करणार आहे, असा इशारा भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांनी दिला.
जगन्नाथ राळेभात व माझी सेटिंग होती. राजकारणात देवाण-घेवाण असते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या प्रचारासाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव व संचालकांची बैठक घेण्यात आली.
गौतम उतेकर, डाॅ. भगवान मुरूमकर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, मनोज राजगुरू, सुधीर राळेभात, मकरंद काशीद, करण ढवळे, सुभाष जायभाय, बाजीराव भोंडवे, पृथ्वीराज वाळुंजकर, अमोल राळेभात, पांडुरंग सोले, विठ्ठलराव राऊत, बाळासाहेब शिंदे, अंकुश कोल्हे, भारत काकडे, अरुण वराट, कैलास वराट, दादासाहेब वारे, बबन ढवळे आदी या वेळी उपस्थित होते.
सुधीर राळेभात म्हणाले, आपण प्रचारासाठी आलो का कबुलीनामा सांगण्यासाठी, याचा विचार करा. असे दिसते की, आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अंधारात ठेवले. आम्ही मनापासून काम करणार आहोत. शंका घेऊ नका. तुमच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगा. मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटले आहेत.
शैक्षणिक प्रश्न, रोजगार व औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटला पाहिजे. सचिवांचेदेखील प्रश्न सुटले पाहिजेत. काही लोक कृषी उत्पन्न बाजार समितीला बदनाम करत आहेत. प्लॉट नियमानुसार दिले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे आहेत, असे राळेभात यांनी यावेळी बोलताना सांगितले.