कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस असूनही प्रचंड गर्दी झाली होती. शुक्रवारी रात्रीच पावसाला सुरुवात झाली होती.
सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाणी जमा झाले असताना भाषण ऐकण्यासाठी लोक उत्साहात उभे होते. शरद पवारही व्यासपीठावर पावसात बसले होते. सिंघम फेम अभिनेते अशोक समर्थ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले यांच्यासह नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार यांनी नेहमीच्या शैलीत भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी वाढली, अनेक उद्योगधंदे बंद पडले. तरुणाई आघाडीबरोबर आहे. त्यामुळे भाजपची झोप उडाली आहे.
शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणणाऱ्यांना मते मागण्याचा अधिकार नाही. सरकारनं राज्याच्या हिताच्या गोष्टी केलेल्या नाहीत, म्हणून आम्हाला परिवर्तन हवं आहे, असे पवार म्हणाले. ५२ वर्षांपूर्वी मी रोहितच्याच वयाचा होतो. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीला उभा होतो. पहिली निवडणूक लढवली, त्यावेळी बारामतीची स्थिती आजच्यासारखी नव्हती. तिथं कॉलेज नव्हते, विविध प्रश्न होते.
आज मात्र बारामतीचा चेहरा बदला आहे. त्यासाठी बरीच वर्षे लागली. पण तुमची साथ आणि रोहितची दृष्टी यांचा समन्वय झाल्यास कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलायला पाच-सहा वर्षे पुरेशी आहेत.