शिर्डी – पुढाऱ्यांमध्ये भांडणे लावून जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या शरद पवार यांनी प्रचारादरम्यान जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर एक शब्दही उच्चारला नाही. जिल्ह्याचे वाळवंट करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्याची योग्य संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
अस्तगाव येथे प्रचार सांगता सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. खासदार सुजय विखे, कैलास कोते, विजय कोते, सचिन तांबे, मुकुंदराव सदाफळ, प्रताप जगताप, नाना बावके, नितीन कापसे, नंदकुमार जेजुरकर, हिराबाई कातोरे, बाळासाहेब गायकवाड, ज्योती त्रिभुवन या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, नगर जिल्ह्याला दुष्काळात होरपळत ठेवून राजकारण केले गेले. केवळ विखे कुटुंबाला त्रास देण्यासाठी व विकासकामात आडकाठी आणण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजवर केले. मुळा-प्रवरा संस्था बरखास्त केली.
निळवंडेसाठी आडमुठेपणाची भूमिका घेतली. जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देणे व निळवंड्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत नेणे हेच टीकाकारांना योग्य उत्तर असणार आहे. शिर्डीत विकासाचे मोठे प्रकल्प राबवले गेले. विमानतळ, रेल्वे आली, गणेश कारख़ाना सुरू केला.
शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण झाले.
याउलट संगमनेरचे चित्र आहे. संगमनेरच्या नेत्याने भूमिपुत्रांना रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली नाही. पठार भागातील शेकडो तरुणांना मुंबई, ठाण्यात हमाली करावी लागते, असा सवाल विखेंनी केला.