निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे दांडीबहाद्दर अडचणीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन नगर शहर मतदारसंघातील तिघांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान साहित्य नेण्यासाठी दोन केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी यांनी टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. 

या तिघांच्या सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगर शहर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

काल रविवार रोजी नगर शहर मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक काकांसाठी नियुक्त असलेले सुभाष मस्करे, भीमा जगधने (दोन्ही केंद्राध्यक्ष), अंकुश लबडे (मतदान अधिकारी) तिघांनींआयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करीत कामात कुचराई करत निवडणुकीच्या कामात दांडी मारली. 

यामुळे तिघांविरोधात निलंबनाचा प्रस्ताव करण्यात आला आहे. हा प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकारी द्विवेदी यांना पाठवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामात कुचराई करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24