जामखेडला मतदानाचा टक्का वाढला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड – जामखेड शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पावसाने उघडीप दिल्याने सर्वांना मतदान करता आले. त्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. सकाळी मतदान करण्यासाठी येणाऱ्यांत महिलांची संख्या जास्त होती. नवमतदार प्रथमच आपला हक्क बजावत असल्याने त्यांच्यात उत्साह दिसत होता. दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बांधखडक येथील घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची समोरासमोर लढत आहे. सकाळी आठ वाजता मंत्री शिंदे यांनी आपले गाव चोंडी येथे अहिल्येश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन कुटुंबातील आई-वडील, पत्नी व दोन मुलींसह जात मतदान केले.

सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने कार्यकर्त्यांनी नि:श्वास सोडला. मतदान केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे मतदारांना चिखल तुडवत जावे लागत होते. वयोवृद्ध महिलांना जास्त कसरत करावी लागत होती. यांना साधा रस्ता करता येत नाही का, असा उद्विग्न प्रश्न विचारला जात होता. ही कुजबूज ऐकून काही व्यापाऱ्यांनी ट्रॅक्टरमधून मुरूम आणून टाकला.

 विरोधी कार्यकर्त्यांनी तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्याकडे याबाबत तोंडी तक्रार करत विचारले, या मुरुमाची त्यांनी रॉयल्टी भरली आहे का. मी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्याबळावर मी निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंब माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराविरोधात उतरले, यातच माझा विजय आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी चोंडी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24