मी म्हातारा झाल्याचे कोणत्या शहाण्याने तुम्हाला सांगितले. ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सातारा : आम्हाला सोडून गेलेल्यांचा सन्मान झाला नाही. आठवडाभरापूर्वी मी कोणीतरी कोणाला पगडी दिल्याचे टीव्हीवर पाहिले. ज्यांनी त्यांना पगडी दिली, तिच पगडी त्यांनी पुन्हा संबंधिताच्या डोक्यावर ठेवली. जिथं सन्मान नाही, तिथे सातारा कधी झुकला नाही, ही सातारची परंपरा आहे. मात्र, आज काय आहे.

यशवंतरावांच्या जिल्ह्यात आम्ही भाजपाचा विचार स्वीकारला, असे काहींना सांगावे लागते,’ असे सांगतच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेले उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर चांगलेच शरसंधान साधत ‘हे वागणं बरं नव्हं..!,’ असेही खडसावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद मेळावा रविवारी शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दीपक पवार भाजपा सोडून राष्ट्रवादीत आले. यावेळी शरद पवारांनी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंवर नाव न घेता जोरदार आसूड ओढत ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला आता गुलालाची उधळण करण्यासाठीच साताऱ्यात बोलवा,’

असे जाहीरपणे सांगूनही टाकले. याचवेळी त्यांनी रामराजेंचे नाव न घेता त्यांच्याविषयीही नाराजी व्यक्त केली. पवारांच्या भाषणाला तरुणाईने सर्वाधिक प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

शरद पवारांनी सोशल मीडियावर तसेच माध्यमातून होणाऱ्या टीकेचाही चांगलाच समाचार घेतला. मी म्हातारा झालो असल्याचे म्हटले जात असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘मी म्हातारा झाल्याचे कोणत्या शहाण्याने तुम्हाला सांगितले. कोणत्या बापजाद्याने तुम्हाला ही माहिती दिली.

तुम्ही अजून माझे काय बघितले आहे आणि माझ्याकडे काय आहे, हे बघण्याची तरी कोणाची हिंमत आहे. अरे, या वयात अठरा ते वीस तास काम करण्याची माझ्यात हिंमत आहे. मी नाशिकपासून ते हिंगोली पालथी घातली आहे. अजूनही फिरत आहे. शिवबांनी घडवलेला आणि यशवंत विचारांनी प्रेरित झालेला महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हातात जाऊन देणार नाही. ते काम आता तुम्ही करा. त्यासाठी तुमची साथ हवी.’

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24