दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं. १८ फेब्रुवारी २०२० पासून बारावीच्या तर ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानंं  http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरवेळापत्रक उपलब्ध करून दिलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १८ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. तर ३ मार्च ते २३ मार्चदरम्यान, दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

दरम्यान, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या हेतूनं आणि अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीनं यावेळी वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आल्याचं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच हे संभाव्य वेळापत्रक असून परीक्षेपूर्वी महाविद्यालयं आणि शाळांमध्ये पाठवण्यात येणारं परीक्षेचं वेळापत्रकच अंतिम मानण्यात येणार असल्याचंही मंडळाकडून सागंण्यात आलं.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळांकडे तसंच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखीस्वरूपात पाठवाव्यात, असं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अन्य काही वेबसाइट्स, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल माध्यमांतून प्रसिद्ध किंवा व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असं आवाहनही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याकडून करण्यात आलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24