राजकारणात आता ‘कार्यकर्ता’ अस्ताला जातोय व ‘पुढारी’ नावाची नवी जमात राजकारणाच्या रिंगणात ‘दादा’ म्हणून मिरवतेय. अशा चिंतादायी काळात ज्यांच्याकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्शाचे महामेरू म्हणून बघावे ते बी. जे. खताळ पाटील यांचे निर्वाण झाल्याने राजकारणातील दीपस्तंभ कोसळून पडल्याचे जाणवतेय. .
मागे वळून पाहण्याचा मोह होतो व मग लक्षात येते, स्वातंत्र्य चळवळीने केवळ स्वातंत्र्य दिले, असे म्हणणे स्वातंत्र्य चळवळीचा संकोच ठरेल. स्वातंत्र्य चळवळीने स्वातंत्र्योत्तर काळात देश बांधणारे, माणसाच्या एकीची मोट बांधणारे कार्यकर्ते व नेते या देशाला दिले; अन्यथा स्वातंत्र्यक्रांती ही निराशेच्या ढगांनी व्यापली जाऊन ‘इंग्रज बरे होते’ या प्रतीक्रांतीचा धोका ठरली असती. १९४७ नंतरची काही दशके देशाच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण होती.
अशा काळात देशवासियांच्या भाग्यरेषा उजळून टाकणारी समाजधुरिणांची एक पिढी रात्रंदिवस समाजकारणात राबली. अशाच मान्यवर नेत्यांच्या नामावलीतील अग्रणी नाव श्रद्धेय बी.जे.खताळ पाटील यांचे आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडत असताना ती नाकारणारा व मी शंकररावांना (चव्हाण सो) शब्द दिला आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, हे सांगणारे खताळ पाटील होते.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडून पाटबंधारे खाते मागवून घेवून ‘जलाशये निर्मावी’ हे ज्ञानदेवांचे वचन कृतीत आणणारे बी. जे. खताळ पाटील हे अमृतवाहिनी प्रवराकाठावरील २० व्या शतकातील ज्ञानदेवांच्या संतवचनाचे पालन करणारे समाजकारणी ठरले. आज महाराष्ट्राची १८ टक्क्याच्या दरम्यानची भूमी ओलिताखाली भिजत आहे. याच योजना त्यांच्या मंत्री म्हणून केलेल्या कामाची साक्ष देतील.
श्रद्धेय बी. जे. खताळ पाटील माझे आजोबा असल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा मी जवळचा साक्षीदार आहे. मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यामधील राजसत्तेचे विलासी किंवा सुखवस्तू जीवन त्यांनी स्वत: भोगले नाही व कुटुंबियांनीही अपेक्षा केली नाही. कुटुंबियांनी त्यांची मुले व मुलगी मुंबई कार्पोरेशनच्या बसने शाळेला जात होती. प्रवरानगरला मेडिकलला असलेले धाकटे चिरंजीव संगमनेरला येण्यासाठी कोल्हार-घोटी रोडवर वाट बघत उभे असताना मा.मंत्री बी.जे.खताळ पाटील यांची गाडी संगमनेरला गेली.
मुलाची व त्यांची नजरा-नजर झाली. गाडी मात्र थांबली नाही. सरकारची गाडी फक्त मंत्र्यासाठी असते, कुटुंबासाठी नाही. हे त्यांचे रोखठोक उत्तर होते. यापेक्षा अधिक काही न सांगणेच योग्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी मुलखातील हा मावळा समाजकल्याणाच्या राजकीय मोहिमा सर करीत महाराष्ट्र घडविण्याची कामगिरी फत्ते करून इहलोकीच्या प्रवासाला आनंदात गेला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसमधील काही मान्यवर नेते सत्तेत सहभागी न होता समाजकारणात रमले.
खताळ पाटील यांनी सत्तेचे साधन कौशल्याने व नेक बुद्धीने वापरून रयतेच्या हिताचे समाजकारण केले. सत्तेलाच साध्य समजून सत्ताप्राप्ती हेच राजकारण मानून राजकारणाचा खेळ खेळणाऱ्यांनी आता तरी काँग्रेसी राजकारणाची केविलवाणी स्थिती विचारात घेवून खताळ पाटील यांची राजनिती पक्ष सावरण्यास उपयोगात आणावी. देशाला या राजनितीची गरज आहे. – मधुकरराव नवले