नगर : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे अनेक अपघात होत आहेत. नागरिकांना कशीबशी वाट शोधत जीव मुठीत धरत मार्ग काढावा लागत आहे.
त्यामुळे नगर शहरातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या शिष्टमंडळाने मनपा अधिकार्यांची भेट घेऊन तात्काळ कामाला सुरुवात करण्याची मागणी केली. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी यावेळी शिष्टमंडळाने चर्चा केली.
यावेळी मनपा अधिकाऱ्यांना काळे यांनी शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो अधिकार्यांना दाखवत त्यांना धारेवर धरले. प्रशासनाने याबाबत पुढाकार घेत आपले कर्तव्य का बजावले नाही, असा सवाल काळे यांनी अधिकाऱ्यांना केला.
शहरातील नागरिक हे या खड्ड्यांमुळे त्रस्त असून अनेकांना यामुळे पाठीचे, मणक्याचे विकार जडले आहेत. लोकांना होणाऱ्या या त्रासाला प्रशासन जबाबदार आहे. शहरातील रस्त्यांची कामे होत असताना मुळातच त्यांची दर्जेदार कामे केली जात नसल्यामुळेच मनपाने केलेले रस्ते अल्पावधीतच खराब होतात, असा आरोप काळे यांनी यावेळी केला.
यामध्ये मनपातील अधिकारी आणि शहरातील पुढारी टक्केवारी खातात. त्यामुळे त्याचा सगळ्यात मोठा त्रास हा सामान्य नगरकरांना सोसावा लागतो. इथून पुढे वंचित बहुजन आघाडी शहरामध्ये महानगरपालिका आणि शासनाच्या इतर निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
होणाऱ्या प्रत्येक कामांच्या टेंडरमध्ये नमूद करण्यात आलेल्या निकषांप्रमाणे दर्जेदार काम करून घेण्यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरून प्रशासनाकडून कामे करून घेणार असल्याचे काळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
काळे यांनी आपल्या वचननाम्यात सांगितले होते की, मी कधीही टक्केवारी खाणार नाही. आज मनपा अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या कामाबाबत जाब विचारत असताना काळे यांनी सांगितले की मी टक्केवारी खाणार तर नाहीच पण कोणाला खाऊ पण देणार नाही. इथून पुढे टक्केवारी खाणाऱ्यांची गाठ किरण काळे आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी भारिपचे सरचिटणीस सुनील शिंदे, हनीफ शेख, विनोद गायकवाड, स्वप्नील पाठक, संजय पंचमुख, संदीप भिंगारदिवे, सोनू पंचमुख, योगेश थोरात, संदीप गायकवाड आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.