माजी आ. अनिल गोटे शिवसेनेच्या वाटेवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

धुळे : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आ. अनिल गोटे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाशी फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

त्यातच अनिल गोटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सोशल माध्यमांमधून होत आहे. अनिल गोटे शहर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. गेल्यावेळी त्यांनी भाजपाचे निशाण हाती घेतले होते.

भाजपाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याही वेळी गोटे यांनी विरोधकांना चितपट करत विधानसभेत पाय ठेवला. परंतु कालांतराने अनिल गोटे यांचे भाजपातील काही नेत्यांशी बिनसले आणि त्यांचे संबंध अगदीच टोकापर्यंत गेले. परिणामी, महापालिका निवडणुकीत स्वत:चे वेगळे पॅनल उभे करून अनिल गोटे यांनी भाजपाशी बंड केले.

त्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला; पण भाजपाच्या नेत्यांविषयी विरोधाविषयी धार अधिक तीव्र केली. यातच आता विधानसभा निवडणूक लागल्याने अनिल गोटे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतील की अपक्ष लढतील याविषयीचे तर्कवितर्क लावले जात होते.

परंतु कधी काळी शिवसेनेशी जवळीक साधून असल्याने या निवडणुकीत अनिल गोटे शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, अशी जोरदार चर्चा सोशल माध्यमांमधून होत आहे. यामुळे लवकर ते शिवबंधनात अडकतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना स्वत: अनिल गोटे हे अध्यक्ष असलेल्या लोकसंग्रामचे नेते तेजस गोटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24