अहमदनगर – २०१४ मध्ये लोकांनी रिजेक्ट केलेला माल सत्ताधारी नविन पॅकिंग मधून २०१९ मध्ये बाजारात आणत आहेत. पण हा रिजेक्टेड माल जनता कसे स्विकारेल ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करत राज्याचे राजकारण नवीन स्टाईलने सुरू झाले आहे.
सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत असून ईडी, सिबीआय चा धाक दाखवून विरोधकांना पावन करून घेतले जात आहे. पक्षातून जाणारे ते आपलेच आहेत, त्यामुळे उद्या कोणाचेही सरकार आले तरी ते आपलेच असणार आहे. नगर पारनेर मतदारसंघातून निलेश लंकेच आमदार होईल असा विश्वास व्यक्त करत निलेश लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे.
निलेश लंके यांच्या १८ दिवसापासुन सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप आज सायंकाळी नगर तालुक्यातील अरणगाव येथे झाला. यावेळी खा. सुळे बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनशाम शेलार, अशोक सावंत, माजी महापौर अभिषेक कळमकर,
किसन लोटके , बबन डोंगरे, गोरख दळवी, अशोक झरेकर आदी उपस्थीत होते. यावेळी खा . सुळे म्हणाल्या की नगरचे राजकारण फारच गमतीशीर आहे कोण कोणत्या पक्षात आहे तेच कळत नाही. निलेश लंके यांनी पक्ष स्वताच्या स्वार्थासाठी नाही तर काही तरी बदल व्हावा म्हणुन केला आहे.
लंके यांच्या संपत्तीची चौकशीची करण्याची मागणी करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे जर चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही तर आम्ही च तुमच्या संपत्तीची चौकशी लावु अशी टिका सुळे यांनी आमदार विजय औटी यांचे नाव न घेता केली.
त्या पुढे म्हणाल्या की , बारामतीला विकास म्हणजे विकासच करावा लागतो. त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते. नगर सारखे हेलिकॅप्टरचा विकास आमच्याकडे चालत नाही. पुरग्रस्तांसोबत सेल्फी काढण्याची हौस त्यांना सुचतेच कशी ?
त्यांची पैशांची आणि सत्तेची मस्ती लोकच उतरवतील असा टोमणा त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना लगावला. मुख्यमंत्री वाळकीत येऊन साकळाई योजनेचा शब्द देतात आणि त्यांचे मंत्री योजना होणार नसल्याचे सांगतात मग खोटे नक्की कोण बोलत आहे असा सवाल त्यांनी केला.
छावण्या बंद केल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत हे अंसवेदनशिलपणाचे लक्षण आहे. मला दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचे शद्ब आठवतात ‘ आकडोंसे पेट नही भरता, भुख लगती है तो धान लगता हे ‘ हाच प्रश्न मला मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे.
हि सुशिक्षित बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ताधारी वाईट आहे म्हणुन राष्ट्रवादी हवी असे नाही तर आम्ही त्यांच्यापेक्षा कर्तुत्ववान आहोत म्हणुन राष्ट्रवादीची राज्याला गरज आहे.
त्या म्हणाल्या की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलला म्हणुन त्रास देणार असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही. सुडाचे घाणेरडे राजकारण सत्ताधाऱ्यांनी सुरू केले. विरोधक आमच्या सारखे दिलदार हवेत. शेतकरी कर्जमाफीसाठी मी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निलेश लंके म्हणाले की , १८ दिवस प्रवास करून जनसंवाद यात्रेचा समारोप होत आहे या दरम्यान सर्वसामान्यांचे प्रश्न, दुःख जवळुन पाहिले. पुर्ण मतदारसंघात विकास शोधत फिरलो पण विकास कुठेच दिसला नाही. त्यांनी जनतेचा फक्त अपमानच केला आहे, त्यामुळे जनताच आता त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी ना. औटी यांच्यावर टीका केली.