२३ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ तील अपात्र लाभार्थीकडून योजनेचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत. तसा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यापूर्वी महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारणारे अर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने केले आहेत. याविषयी वेगवेगळ्या माध्यमांकडून गैरसमज पाहायला मिळत आहेत. मात्र, आतापर्यंत आम्ही एकाही महिलेचे पैसे परत घेतलेले नाहीत.पैसे असे परत घेण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.काही महिलांनी नोकरी, नवीन गाडीची खरेदी आदी कारणांमुळे योजनेत अपात्र ठरत असल्याने पैसे परत करण्यासाठी स्वतःहून अर्ज केले आहेत.
पालिका निवडणुकांनंतर योजना बंद होणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ देणाऱ्या म महायुती सरकारने आता लाभार्थीची छाननी सुरू केली असून अपात्र करण्याचा धडाका लावला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद होईल, असा दावा युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केला.
लाडकी बहीण, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, जुनी पेन्शन योजना २ आदी मुद्द्यांवरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले. ज्या अपात्र बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे आहेत, अशा अपात्र बहिणींची यादी हे सरकार महापालिका निवडणुकीनंतर वाढवेल, असा माझा अंदाज आहे.
‘घ्यायचे तेवढे आमदार घ्या’
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील खासदार, आमदार कधीही येऊ शकतात, असा दावा करणाऱ्या उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आदित्य यांनी समाचार घेतला. ‘तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिले आहे; तर काम करा,’ असे ते म्हणाले. सामंत हेच शिंद यांचे आमदार फोडण्याची तयारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमच्या मेळाव्यात नायक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी, २३ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे.त्या मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम होणार असल्याचे समजते. त्यांच्या मेळाव्यात गायक तर आमच्या मेळाव्यात नायक असतील, अशी टिप्पणी आदित्य यांनी केली.
पालकमंत्री पदाबाबत जो निर्णय होईल तो मान्य !
महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले. पालकमंत्री पदाबाबत महायुतीच्या नेतृत्वाकडून जो निर्णय घेतला जाईल, त्याचे पालन होईल. माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे.