Marathi News : धबधब्यांवर पर्यटकांना ‘नो एण्ट्री ! नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : पावसाळ्यात पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण परिसरात पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

यंदा मात्र पर्यटकांना याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. यंदा पाऊस कमी असला तरी पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण परिसरात प्रतिबंधक कायद्यांतर्गत १४४ कलम लागू करण्यात आले असून पर्यटकांना याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर कोंडेश्वर येथील मार्गावर कुळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना स्वतः पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी स्वतः जाऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तसेच यासाठी बदलापूर शहर पोलीस स्टेशन पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनीदेखील स्वतः या ठिकाणी नदी परिसरात स्वतः जाऊन नदीवर पोहण्याचा आणि भिजण्याचा आनंद घेण्याच्या नादात वाढत्या पाण्यात उतरलेल्या नागरिकांना बाहेर येण्याचे आवाहन करून जवळपास ५०० नागरिकांना या ठिकाणहून बाहेर काढले.

या पर्यटन स्थळावर दरवर्षी पावसाळ्यात ठाणे जिल्हा व मुंबई शहरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात, मात्र त्यांना इथल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने अनेकदा पाण्यात पोहण्याचा, भिजण्याचा आनंद घेत असताना यातील काहींना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.

त्यामुळे शासनाने नियम घालून दिलेल्या पर्यटन स्थळावर न येता सुरक्षित व कमी पाण्याच्या ठिकाणी पावसाळी सहलीचा आनंद घेण्याचे •आवाहन कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी केले आहे.