महाराष्ट्र

वर्गात आता शिक्षकांना नो मोबाईल ! ह्या जिल्ह्यात झाला निर्णय

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आता वर्गात मोबाईल नेता येणार नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी त्यासंबंधीचा आदेश काढला असून, वर्गात मोबाईलवर बोलणारा शिक्षक सापडल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारा कोल्हापूर हा राज्यात पहिला जिल्हा असून, यामुळे शिक्षकांना आता शिस्त लागेल, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.

अलीकडे जिल्हा परिषद शाळा तसेच शासकीय मान्यता असणाऱ्या पण खासगी शाळांची गुणवत्ता ढासळत असून, त्याला शिक्षकांचा मोबाईलवरील व्यस्तपणाही कारणीभूत आहे. शिक्षकच मोबाईलचा वापर करत असल्याचे सरांस पाहायला मिळत असल्याने त्याचेच अनुकरण मुले करतात. त्यांचे मोबाईल वेड वाढत असल्याचा एका स्वयंसेवी संस्थेचा धक्कादायक अहवालही समोर आला आहे.

इतकेच नव्हे तर अनेक शाळांमध्ये काही शिक्षक हे मोबाईलवर केवळ व्यस्तच नव्हे, तर नको त्या साईटस् ओपन करत असल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अनुचित प्रकारही घडत असून, याला आळा घालण्यासाठी आंबोकर यांना ही कडक भूमिका घ्यावी लागली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासह शिस्तपालनासाठी शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी शाळांना एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये शिक्षकांना वर्गात अध्यापन करताना मोबाईल वापरता येणार नाही, जर कुणी मोबाईल वापरताना आढळल्यास त्याच्यावर ऑन दि स्पॉट कारवाई करण्याचे आदेशही मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता शिक्षकांनी वर्गात जाताना मोबाईल पार्किंगमध्ये आपला मोबाईल जमा करूनच अध्यापन करायचे आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी अनेक शाळांमध्ये सुरू झाली आहे.

अनेक शिक्षकांनी या आदेशाचे स्वागत केले असून, सर्वच माध्यमिकच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या शाळांमध्ये असा नियम लावल्यास मुलांमध्ये संप्रेषणाची वाढ होऊन सुसंवाद घडू शकेल, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव आणि तळसंदे गावांनी सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य गावांनी त्यांचे अनुकरण करावे, त्याचाही केवळ शाळाची गुणवत्ता वाढीस नव्हे, तर संस्कारशील पिढी होण्यास मदत होईल. यासाठीही मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत, असे परिपत्रक काढले असून त्याला यश मिळेल.- एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Ahmednagarlive24 Office