अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अमरावती ;- कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे; परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय लवकरच करू, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावती येथे दिले.
अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.
ते म्हणाले, आमच्याकरिता शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. याचमुळे आमची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होताच आम्ही सर्वांत आधी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे.
याकरिता त्यांना कधीच रांगेत उभे राहण्याची गरज नाही तर कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. थेट कर्जमाफी करून सरळ आणि सोपे काम हाच आमचा फॉम्र्युला आहे. यामधून जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
त्यामुळे त्यांचाही विचार लवकरच आम्ही करणार आहोत. शिवाय दोन लाखांवरील कर्जदारांचे काय करावे, हेही विचाराधीन असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.