महाराष्ट्र

देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही

Published by
Sushant Kulkarni

३१ जानेवारी २०२५ पुणे : केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरवला. त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे, परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही. त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते. अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उ‌द्घाटन नन्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. संस्थेच्या ‘उडान’ या अंकाचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार, अॅड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाबद्दल तळागाळामध्ये द्वेष आणि चीड निर्माण झाली आहे. परंतु अशा प्रकारे राजकारणाबद्दल द्वेष का निर्माण झाला आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. अनेक जण आज केवळ पैसा मिळवण्यासाठी राजकारणामध्ये येतात, हा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजला आहे. परंतु राजकारण हे समाजकारण करण्याचे एक साधन आहे,असे त्यांनी सांगितले.

स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ चांगले शिक्षण देत नाही, तर एक समृद्ध पिढी घडवत आहे. या संस्थेने कायमच नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तरुण निर्माण केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेला स्वायत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार करत आहे आणि त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Sushant Kulkarni