Marathi News : कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, सिन्नर, वैजापूरमध्ये पाऊस नाही ! गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : नांदूर मध्यमेश्वर धरणातून १२५० क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून सदरचे पाणी गोदावरी नदीतून सोडण्याऐवजी गोदावरी कालव्यातून सोडण्यात यावे, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. नितीन पोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पावसाळा सुरू होऊन दिड ते दोन महिने होत आले. मात्र अजून तरी कोपरगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून सोयाबीन, मकाची पेरणी केली. मात्र बोगस बियाणे व पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके वाया गेली.

मात्र पाटबंधारे विभागाने नांदूर मध्यमेश्वर धरणातून १२५० क्यूसेक पाणी गोदावरी नदीतून सोडण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणारे पत्रक काढले आहे.

कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, सिन्नर, वैजापूर आदी तालुक्यात अजून तरी पुरेशा पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून गोदावरी नदीवर असलेल्या उजव्या व डाव्या कालव्यातून ओहरफ्लोचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्याच प्रमाणे या ओहरफ्लोच्या पाण्यातून शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका आदी पिके वाचवता येऊ शकतील.

राज्यात सध्या विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनीधी अजून तरी कोणीच मागणी करताना दिसत नाही. मात्र वेळ निघून गेल्यावर श्रेय वादात कोपरगाव शहरात ओहरफ्लोच्या पाण्याऐवजी फ्लेक्सचा फ्लो येतो, असा अनुभव आजवर अनेकदा कोपरगावच्या जनतेने घेतला आहे.

कोपरगाव व आजूबाजूच्या तालुक्याची पर्जन्य व पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन गोदावरी नदीच्या पात्रातून सोडलेले ओहरफ्लोचे पाणी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडवे, असे या पत्रकात म्हटले आहे.